डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत यंदा संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र
schedule02 May 25 person by visibility 46 categoryशैक्षणिक

कोल्हापूर, दि. २ मे: शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला’ ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. यंदा या व्याख्यानमालेमध्ये संविधान संवादक म्हणून देशभरात प्रसिद्ध असणारे राजवैभव शोभा रामचंद्र यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि. ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आ’लोकशाही (@alokshahi) या युट्यूब वाहिनीवरून हे व्याख्यान प्रसारित होईल. व्याख्यानमालेचे आयोजक डॉ. आलोक जत्राटकर आणि संतोष पिसे यांनी ही माहिती दिली.
दि. ४ मे २०२५ रोजी डॉ. भालचंद्र काकडे यांचा चतुर्थ स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत ‘भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर राजवैभव यांचे व्याख्यान होईल. राजवैभव यांनी भारतीय संविधानाबाबत समाजात सर्वदूर जागृती निर्माण करण्यासाठी काम चालविले आहे. संविधान संवाद समितीचे ते सचिवही आहेत.
डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला ही विज्ञान विषयाला वाहिलेली असून गेल्या तीन वर्षांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. पी.एस. पाटील, वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अजित तेळवे, ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे, ‘कोविड-१९’वरील लस संशोधनात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या चमूमध्ये योगदान देणारे जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात, पाच विद्यापीठांचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि अभियंते विनय कुलकर्णी यांची अतिशय लक्षवेधक व्याख्याने झालेली आहेत. ती आजही मोठ्या प्रमाणावर ऐकली जातात. सदर व्याख्यानमाला आ’लोकशाही या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित होणार असून त्यात प्रेक्षकांना युट्यूबवर @alokshahi या वाहिनीवर जाऊन सहभागी होता येईल.