Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करावेत*

schedule02 May 25 person by visibility 62 categoryराजकीयसामाजिक

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करावेत*
 
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत क्षेत्रातील 2 कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये दि. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. इच्छुक महिलांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे स्वतःची वैयक्तिक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशिलासह अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस. वाईंगडे यांनी केले आहे.
 
 
महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरीता हा पुरस्कार देण्यात येत आहे.
पुरस्काराचे स्वरुप - सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ (नारळ), रोख रक्कम (रु.५००/- प्रती महिला) याकरीता महिलांनी स्वतःची वैयक्तिक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशिलासह अर्ज ग्रामपंचायतीकडे सादर करावयाचा आहे.
 
पुरस्काराचे निकष पुढीलप्रमाणेः- महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट, उल्लेखनीय कार्य करीत असलेली महिला, या महिला त्याच ग्रामपंचायतीतील / गटग्रामपंचायतीतील रहिवाशी, त्यांचे कार्य त्याच ग्रामपंचायतीत / गट ग्रामपंचायतीत केलेले असावे, महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 3 वर्षे कार्य केलेले असावे, पुरस्कार प्राप्त महिला 7 वर्षानंतर या पुरस्कारासाठी पात्र ठरतील, महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलता असावी, सामाजिक क्षेत्रात सहभाग असावा, महिला अत्याचारामध्ये समाविष्ट नसावी, बालविवाह प्रतिबंध, हुंडानिर्मुलन, लिंग चिकित्सा प्रतिबंधक, घरगुती हिंसा प्रतिबंधक, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहायता बचत गट, आरोग्य, साक्षरता इ. कार्यात सहभाग असावा.
 
ग्रामपंचायत स्तरावर दोन कर्तबगार महिलांची निवड करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची समिती गठित करण्यात येणार आहे. 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes