शालेय आयडी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे
schedule03 May 25 person by visibility 55 categoryगुन्हे
शिरोळ : प्रतिनिधी : अनेक बोगस शालार्थ आयडीमुळे मोठा आर्थिक घोटाळा होत आहे. या शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे अस्तित्वात नसलेल्या शाळांतही नियुक्त्या व शालार्थ पोर्टलवर नोंद केलेल्या वेतन पथकाकडून या संदर्भात मंजुरी कशी मिळाली? तसेच शिक्षण विभागाने अंतिम मंजुरी देताना अर्थपूर्ण घडामोडी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा जनता दल सेक्युरल पक्षाच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा जनता दल सेक्युलरचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रवीणभाई माणगावे यांनी दिला आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे जवळपास राज्यात ५८० तर कोल्हापूर जिल्ह्यात ८८ बोगस शालार्थ आयडी शिक्षण विभागाच्या सिस्टीमला जनरेट झाल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असल्याने अस्तित्वात नसलेल्या शाळांतील शिक्षकांचाही शालार्थ आयडी बनवून वेतन उचलण्यात आल्याची धक्कादायक व गोपनीय माहिती समोर आली आहे. त्यामुळे शालार्थ आयडीचा हा घोटाळा सन २०१९ सुरू असल्याने जवळपास ८० ते ८५ कोटीच्या आसपास हा आर्थिक घोटाळा झाला आहे.
या प्रक्रियेत बनावट आणि चुकीच्या माहितीद्वारे शालार्थ आयडी तयार करून काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वेतन मिळवले आहे. वास्तविक नियुक्त झालेल्या शिक्षकाला शालार्थ आयडी मिळवण्यासाठी शाळेने शालार्थ पोर्टलवर नोंदणी करणे शिक्षकाची माहिती आणि कागदपत्रे भरणे आवश्यक आहे. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकाला शालार्थ आयडी मिळते त्याचा वापर वेतन आणि इतर कामासाठी केला जाऊ शकतो. परंतु गतकाळात अस्तित्वात नसलेल्या शाळांची नोंद शालार्थ पोर्टलवर कशी करण्यात आली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा जनता दल सेक्युलर पक्षाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा या पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रवीणभाई माणगावे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदरचे निवेदन जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.